मंगेश पाडगावकर (१०.०४ .२०१३)

AbhiShri | | Sunday, April 28th, 2013
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सायंकाळी ७ ला कामावरून घरी आलो आणि मोबाईल वर तृप्ती चा sms वाचला – “नमस्कार मंडळात ७.३० – ८ ला मंगेश पाडगावकर यांची मुलाखत आहे. जमल्यास येणे!” त्याक्षणी कार्यक्रमाला जायचंच असं ठरवलं. ‘आजीलासुद्धा   दुचाकीवर बसवून नेऊ’ असा विचार केला आणि लगेच दुसऱ्या क्षणी घोडेखोत आळी जवळील संध्याकाळच्या वाहनांची ओसंडून वाहणारी गर्दी डोळ्यासमोर आली. पण आजीचा उत्साह बघता म्हटलं “साक्षात मंगेश पाडगावकर ऐका / बघायची संधी सोडता कामा नये.” धनश्री-संस्कार ला डॉक्टर कडे जायचे असल्याने शेजारच्यांची दुचाकी घेतली आणि ५ मिनिटात नमस्कार मंडळात पोहोचलो. मंगेश पाडगावकर, कल्याणच्या महापौर वगैरे  नुकतेच आले होते. तृप्ती तिच्या आई-मुलीबरोबर आजीसाठी जागा पकडून बसली होती. पुढचे सुमारे १.५ -२ तास पाडगावकरांच्या जबरदस्त उत्साहात आणि  उत्साह देणाऱ्या कवितांमध्ये न्हाऊन निघालो. वयामुळे थोडं ऐकायला कमी येत असले तरी त्यांची विनोदबुद्धी, खणखणीत आवाज आणि आपल्याला लाजवेल असा उत्साह पाहून अवाक झालो. प्रेम आणि निसर्गावर कविता करण्याचा हातखंडा असलेल्या पाडगावकरांची “सलाम” हि सामाजिक परिस्थितीवरची  कविता ऐकली आणि सामान्य माणसाची त्यांनी मांडलेली घालमेल ऐकून थोडा थक्क , थोडा लज्जित झालो.  कार्यक्रम संपला तेव्हा मनाची अवस्था खरंतर सांगूच शकत नाही. ८४ वर्षांची ती निरागस मूर्ती अजून थोडा वेळ  बघायला म्हणून मी -आजी बाकी लोकांसारखेच ५ मिनिट स्टेज समोर उभे राहिलो.
​मंगेश पाडगावकर - १०.०४ .२०१३
हा सगळा अनुभव किती जणांनी घेतला असेल त्यादिवशी??? ५००?? १०००??  नाही… तेव्हढे कुठे हो आम्ही उत्साही/ रसिक/ जागरूक !!! इनमिन १०० जण असतील.… हो एकावर २ च पुज्य !! ह्या “तुडुंब” प्रतिसादाला जेव्हढे आपण रसिक जबाबदार तेव्हढेच आयोजक !!! कोर्टाच्या आदेशामुळे फलक (hoardings / banner) लावण्यास भले मनाई केली असेल पण अशा प्रतिभावान व्यक्तीच्या कार्यक्रमाच्या जाहिरातीसाठी काय फलकच हवेत का?? एवढे का आपण असल्या जाहिरातबाजीच्या आहारी गेलो???? कोणी बॉलीवूडचा नट नटी , कोणी अ ब क स्वामी /बाबा येणार असता तर बिना जाहिरातीचे शेकडो जण जमले असते “दर्शनाला”. निवडणुकीच्या वेळी (आचारसंहिता लागू असतानासुद्धा) राजकीय रणधुमाळीत आश्वासनांचे फुसके बार  ऐकायला अथवा प्रतिस्पर्धी उमेदवार/ पक्षावर उडवले जाणारे शाब्दिक शिंतोडे ऐकण्यासाठी आणि क्षणभंगुर करमणूक करून घेण्यासाठी पार्क / मैदाने हजारोंच्या “निष्ठावान कार्यकर्त्यांनी” फुलतात … याचे कारण इथून तिथून त्यांच्यापर्यंत जाहिरात केली जाते. पण मग ह्या कार्यक्रमाची पुरेशी जाहिरात का बरं नाही झाली ??? कि जाहिरात तर झाली पण आपणच उदासीनता दाखवली ??? मराठी मनावर गेली ६ दशके आपल्या कवितांनी प्रेमाचा शिडकाव करणाऱ्या कविवर्य मंगेश पाडगावकरांना अनुभवण्यासाठी केवळ १०० माणूस ?????? हिच का आपली सामाजिक जबाबदारी ?? हेच का आपले सामाजिक आरोग्य???
सुरुवातीलाच  माझ्या मनात असे (नको ते ??) विचार चालू असताना मंगेश पाडगावकरांनी एक किस्सा सांगितला. आपले मित्र कुमार गंधर्वांच्या एका कार्यक्रमाला व  भेटायला गेले आणि संपूर्ण प्रेक्षकगृहात जेमतेम १५ माणूस पाहून पाडगावकरांच्या पोटात गोळा आला … कुमार गंधर्व यांना न भेटताच  ते खुर्चीवर जाऊन बसले. पडदा उघडताच नेहमीप्रमाणे नमस्कार करून कुमार गंधर्व २ तास तुफान गायले. कार्यक्रम संपल्यावर गंधर्व पाडगावकरांना म्हणाले “मला कार्यक्रमाआधी का नाही आलास भेटायला??” तेव्हा पाडगावकरांनी कमी प्रेक्षकसंख्येचे खरं ते कारण सांगितले. त्यावर कुमार गंधर्व बोलले “अरे, समोर १५ असू देत वा १५००…  आपण समोर (प्रेक्षक) बघून थोडीच कला सादर करतो … आपण तर आत (मनात) बघून गातो !!!”
पाडगावकरांनी हा किस्सा सांगून आयोजकांना किती दिलासा मिळाला माहित नाही पण छोट्या गर्दीतील माझ्यासारख्या दर्दींना खूप दिलासा मिळाला हे मात्र नक्की !!! हे खऱ्या मोठया माणसाचे लक्षण !!
वेळीच मला कळविण्यासाठी तृप्तीचे अनेक आभार (आणि आयोजकांचे पण  :-)) … कारण जेव्हढा आनंद मला पाडगावकर अनुभवण्यामुळे झाला तेव्हढाच आनंद ७८ वयाच्या ( व त्यापेक्षा जास्त वजनाच्या :-)) आणि  विशेष चालता न येणाऱ्या  माझ्या आजीला तो अनुभव घेता आला ह्याचा झाला !!
(email on 18.04.2013)

No Comments »

No comments yet.

RSS feed for comments on this post. TrackBack URI

Leave a comment

 

© Abhijit Avalaskar